file photo
file photo

कसे मिळणार अल्प मानधनात चांगले प्रशिक्षक? 

नागपूर  : क्रीडा व युवक कल्याण संचालनालयातर्फे संचालित क्रीडा प्रबोधिनीमधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी सहायक प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी राज्य शासन तुटपुंजे मानधन देणार असल्याने नागपुरातील प्रबोधिनीला प्रशिक्षकांडून प्रतिसादच मिळाला नाही. त्यामुळे आता ही संपूर्ण प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली आहे. 

मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलातील क्रीडा प्रबोधिनीत अॅथलेटिक्स, हॅण्डबॉल आणि बॅडमिंटन या तीन खेळांसाठी मानधन तत्त्वावर सहायक प्रशिक्षक, फिजिओथेरेपिस्ट आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना दरमहा अनुक्रमे १५ हजार, १२ हजार आणि ८ हजार रुपयांचे मानधन दिले जाणार आहे. प्रशिक्षक हा एनआयएस डिप्लोमाधारक, राज्य पुरस्कारविजेता प्रशिक्षक, राष्ट्रीय स्पर्धेतील पदकविजेता किंवा राष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षण दिलेला असावा, अशी शासनाने अट घातली आहे. नियुक्ती झालेल्या प्रशिक्षकांना सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास सेवा द्यायची आहे. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे यासंदर्भात निविदाही काढण्यात आल्या. परंतु, कुणाकडूनच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रियाच अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचे वाढते संकट हेही यामागचे आणखी एक कारण असल्याचे समजते. वरील पदांसाठी पुन्हा लवकरच एजन्सीमार्फत जाहिरात देण्यात येणार असल्याचे प्रबोधिनीचे प्राचार्य व जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी सांगितले. 


शासनाकडून मिळणारे मानधन अत्यंत अल्प असून, एवढ्या कमी मानधनावर सहा तास नोकरी करण्यास शहरातील बहुतांश प्रशिक्षक इच्छूक नाहीत. एवढ्या वेळेत इतरत्र खासगी प्रशिक्षण वर्ग घेऊन यापेक्षाही अधिक कमाई करता येऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने किमान भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) प्रशिक्षकाइतके मानधन द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. शिवाय शासनाकडून नियमितपणे मानधन मिळत नसल्याचीही काहींची तक्रार आहे. त्यामुळे शासनाला खरोखरच खेळाडू घडवायचे असतील तर, प्रशिक्षकांसह फिजिओ व वैद्यकीय अधिकाऱ्यालाही अधिक मानधन देणे गरजेचे आहे. तरच क्रीडा प्रबोधिनीला अनुभवी दर्जेदार प्रशिक्षक मिळून भविष्यात चांगले खेळाडू घडतील. 

क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षकांना मानधन देणे हा शासनाचा निर्णय आहे. मानधन कमी असल्याची तक्रार आल्यानंतर, मी पुणे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे मानधन २५ हजारांपर्यंत वाढविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. 
-अविनाश पुंड, जिल्हा क्रीडाधिकारी 

संपादन : मेघराज मेश्राम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com